खासदारांच्या गावालाच टँकरने पाणी; डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
“सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलच्या इशिकाला नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड”
अमळनेर, दि. १६ जून : अमळनेर येथील सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मधील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी इशिका शरद खैरनार हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड पटकावून शाळेचे व शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.
दिनांक १३ व १४ जून २०२६ रोजी विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इंडोर स्टेडियम, देवळी (जि. वर्धा) येथे स्पोर्ट्स शोतो कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया संलग्नित स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, वर्धा यांच्या वतीने राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत इशिकाने काता व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विशेष यश संपादन केले. तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला “नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
इशिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्री. सुरेंद्रजी बोहरा, मुख्याध्यापक श्री. जितेंद्र सिंह, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी चेअरमन बोहरा सरांनी इशिकाच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला. व सर्वांनी तिचे कौतुक केले
इशिकाच्या या यशामागे मास्टर करंदीकर व सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल अमळनेर यांचे फार मोठे योगदान आहे


अमळनेरच्या पोदार लर्न स्कूलचा दणदणीत शुभारंभ! ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; पहिल्याच दिवशी १५० हून अधिक प्रवेश
अमळनेर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अमळनेर येथील ‘पोदार लर्न स्कूल’मध्ये उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे अनोखे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेने केलेल्या भव्य आयोजनामुळे पहिल्याच दिवशी परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले.
ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. शाळेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या आत्मीय स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, तर पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
अल्पावधीतच पालकांचा मोठा विश्वास
गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यामुळे पोदार लर्न स्कूल ने अत्यंत कमी कालावधीत अमळनेर परिसरातील पालकांचा विश्वास संपादन केला आहे. याच विश्वासाचे प्रतीक म्हणून शाळेच्या पहिल्याच वर्षात तब्बल १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
याबाबत माहिती देताना संस्थेचे सचिव प्रशांत सूर्यवंशी म्हणाले, “पालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
बौद्धिक खेळांतून शिक्षणाला नवी दिशा
केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, सर्जनशीलता आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बौद्धिक खेळ, कृतीप्रधान शिक्षण आणि आधुनिक अध्यापन तंत्रांच्या माध्यमातून शिक्षण अधिक रंजक व प्रभावी बनविण्याचा शाळेचा मानस आहे.
यासाठी शाळेत उच्चशिक्षित, अनुभवी आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि भव्य क्रीडांगण
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेत प्रशस्त व सुसज्ज इमारत, आधुनिक वर्गखोल्या तसेच सुरक्षित आणि भव्य क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष भर दिला जाणार आहे.
शहरभरातून कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत, आधुनिक शैक्षणिक दृष्टीकोन आणि सर्वांगीण विकासासाठी केलेली तयारी यामुळे ‘पोदार लर्न School’च्या या उपक्रमशील सुरुवातीचे अमळनेर शहरासह परिसरातील पालकांकडून भरभरून स्वागत आणि कौतुक होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची ही दमदार सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेच्या उज्ज्वल वाटचालीची नांदी मानली जात आहे.


खासदारांच्या गावालाच टँकरने पाणी; डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम
अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार स्मिताताई उदय वाघ यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, गावाच्या विकासाचा आणि सत्तेच्या प्रभावाचा दावा केला जात असताना या गावातील नागरिकांना गेल्या सुमारे २५ ते ३० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रा. पवार यांनी म्हटले आहे की, स्मिताताई वाघ यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षा, विधान परिषद आमदार आणि खासदार अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्या पक्षाच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय जबाबदाऱ्यांवर कार्यरत राहिल्या असून अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. एवढा मोठा राजकीय अनुभव, प्रशासकीय संपर्क आणि सत्तेची ताकद लाभूनही त्यांच्या स्वतःच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला, ही बाब जनतेच्या दृष्टीने गंभीर आहे.
त्यांच्या मते, टँकरने पाणीपुरवठा करणे हा कायमस्वरूपी उपाय नसून तो शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा उपाय आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा अनेकदा अपुरा ठरतो. शिवाय पाण्याच्या गुणवत्तेची व शुद्धतेची खात्री देता येत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. दूषित पाण्यामुळे होणारे आजार, उपचारासाठी करावा लागणारा खर्च आणि ग्रामीण भागातील अपुरी आरोग्य व्यवस्था यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अधिक कठीण बनते.
प्रा. पवार यांनी पत्रकात प्रश्न उपस्थित केला आहे की, “जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीकडे सत्तेची विविध पदे, प्रशासकीय अनुभव आणि निर्णयक्षमतेची संधी असते, तेव्हा सर्वप्रथम आपल्या मतदारसंघातील आणि गावातील मूलभूत प्रश्न सुटणे अपेक्षित असते. मात्र डांगर उर्फ उदयनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम असल्याने सत्ता नेमकी कोणासाठी आणि कशासाठी वापरली जात आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.”
ते पुढे म्हणतात की, “स्मिताताई वाघ यांच्याबाबत कोणताही व्यक्तिगत आकस, द्वेष किंवा राजकीय वैरभाव नाही. त्या गंभीर आजाराशी झुंज देत असूनही सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत, याबद्दल आदर आहे. मात्र सार्वजनिक जीवनातील कार्याचे मूल्यमापन हे जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणावरूनच होत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेली चार दशके सक्रिय राहून, विविध महत्त्वाची पदे भूषवून आणि केंद्र व राज्यात दीर्घकाळ सत्ता असतानाही गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.”
प्रा. पवार यांनी असेही नमूद केले की, गेल्या बारा वर्षांपासून राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर भाजपची सत्ता विविध स्वरूपात राहिली आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या गावासाठी एखादी दीर्घकालीन पाणीपुरवठा योजना, जलस्रोत विकास, जलजीवन मिशन अथवा अन्य कोणत्याही योजनेचा प्रभावी वापर करून प्रश्न मार्गी लावता आला असता. मात्र तसे झालेले दिसत नाही.
“डांगरचे नाव बदलून उदयनगर झाले, पण गावकऱ्यांच्या जीवनात पाण्याचा खरा उदय झाला नाही. आजही महिलांना, ज्येष्ठांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. पिण्याचे पाणी ही चैनीची नव्हे तर मूलभूत मानवी गरज आहे. ती पूर्ण करण्यात यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असतील तर त्याबाबत प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.
शेवटी प्रा. अशोक पवार यांनी सत्ता ही ग्रामीण, गरीब, वंचित, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमान उन्नतीसाठी वापरली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रा. अशोक पवारउपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), जळगाव जिल्हा.



